पुणे : पुणे जिल्ह्यात सध्या सुरू झालेल्या नऊ सहकारी व पाच खासगी अशा १४ साखर कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता १ लाख १७ हजार मे. टन आहे. या साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३६ लाख ५५ हजार मे. टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत ३० लाख ५७ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात सरासरी साखर उतारा ८.३६ मिळाला आहे. मात्र ऊस दराची कोंडी कोणीच फोडलेली नाही. ऊस गेल्यानंतर दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणे बंधनकारक असते. मात्र कारखान्यांनी हा नियम पाळला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
जिल्ह्यातील यशवंत थेऊर, राजगड भोर, घोडगंगा न्हावरे, अनुराज शुगर्स यवत हे ४ कारखाने बंद आहेत. १५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील इतर कारखाने सुरू झाले. आतापर्यंत झालेल्या गाळपामध्ये बारामती अॅग्रोने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सात लाख ३८ हजार टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ५ लाख १९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, तर साखर उतारा सरासरी ६.९४ टक्के एवढा आहे. मात्र सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक साखर उतारा १०.५३ मिळवला आहे. ऊस गेल्यानंतर १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणे बंधनकारक असते. परंतु जिल्ह्यातील एकही कारखान्यांनी हा नियम पाळला नाही. कारखाना चालकांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३५०० रुपये दराने पहिली उचल द्यायला हवी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र उसाचा दर जाहीर करण्याबाबत कारखानदार गप्प आहेत. तसेच शेतकरी संघटना यापूर्वी ऊस दरासाठी तीव्र लढा उभी करत होत्या. मात्र, ऊस दराबाबत शेतकरी संघटनांचे नेतेही गप्प आहेत.