कोल्हापूर : गेल्या पाच-सात वर्षांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रत्येक ठिकाणी अडवणूक होताना दिसत आहे. ऊस तोडणीसाठी मजुरांकडून पैसे मागितले जातात. खुशालीच्या नावाखाली वाहतूकदार आणि तोडणी मजूर प्रत्येक ट्रॉलीमागे हजार रुपयांची मागणी करतात. त्याशिवाय सगळा ऊस कारखान्याला पाठवल्यानंतर जेवणासाठी काही तरी द्या की? अशी मागणीही होते. या सगळ्या प्रकारच्या लुटीने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याबाबत शेतकऱ्यांकडून पैसे घेतले, तर ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांकडून वसूल केले जातील, असे परिपत्रक शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याने संबंधित यंत्रणेला काढले आहे. ‘खुशाली’च्या नावाखाली होणारी लूट थांबविण्यासाठी प्रयत्न चालू झाले आहेत.
साखर आयुक्तांनी याबाबत चार दिवसांपूर्वी सर्व कारखान्यांना कळवले आहे. वर्ष, दीड वर्षे कष्ट करून पिकवलेला ऊस साखर कारखान्याला गळीतास पाठवताना शेतकरी हवालदिल होत आहे. गेली अनेक वर्षे शेतकरी संघटना याबद्दल तक्रार करत असताना, कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. अखेर दत्त कारखान्याने आदेश काढून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले, तर ऊस तोडणी व वाहतूकदाराच्या बिलातून वसूल करण्याचा इशारा दिला आहे. हाच आदर्श इतर कारखान्यांनी घेतला तरच शेतकऱ्यांची लूट थांबेल असे दिसते. याबाबत जयशिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने म्हणाले की, याबाबत आम्ही साखर आयुक्तांकडे पाठपुरावा करत होतो, चार दिवसापूर्वी त्यांनी कारखान्यांना आदेश दिले आहेत. ‘दत्त’ कारखान्यांच्या निर्णयाचे स्वागत इतरांनीही अंमलबजावणी करावी.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.