पुणे : सर्वाधिक ऊस गाळपात बारामती ॲग्रो, दौंड शुगरची आघाडी

पुणे : जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाने गती घेतली आहे. चालू गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये १,४९,१६,२९७ मेट्रिक टन उसाची उपलब्धता अपेक्षित आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज एक लाख १७ हजार मेट्रिक टन क्षमतेने उसाचे गाळप सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत ४१,१०,०५५ मेट्रिक टन म्हणजे सुमारे २८ टक्के उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. त्यापासून ३४ लाख ८७ हजार ९४४ क्विटल साखरेचे उत्पादन तयार झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस गाळपात बारामती ॲग्रो, दौंड शुगरने आघाडी घेतल्याचे दिसते. तर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना १०.६६ टक्के उतारा घेत अव्वल स्थानावर आहे.

याबाबत साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील नऊ सहकारी आणि पाच खासगी मिळून एकूण १४ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू झाले आहे. आता गाळप हंगामाने जिल्ह्यात जोर पकडला असून, सद्यस्थितीत ८.४९ टक्के सरासरी उताऱ्यानुसार जिल्ह्यातील कारखान्यांनी ३४ लाख ८७ हजार ९४४ क्विंटल इतके साखरेचे उत्पादन तयार केले आहे. जिल्ह्यात बारामती अॅग्रो लिमिटेड या खासगी कारखान्याने सर्वाधिक आठ लाख २२ हजार १६८ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. ऊस गाळपात या कारखान्याने आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ दौंड शुगरने आपले स्थान कायम ठेवल्याचे दिसून येत आहे.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here