कोल्हापूर : ऊस दरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी साखर सहसंचालकांनी साखर कारखानदार व आंदोलन अंकुश यांची बैठक आयोजित केली आहे. शिरोळ तहसील कार्यालयात गुरुवार, दि. २ रोजी दुपारी ४ वाजता बैठक होणार आहे. मागील हंगामात गाळपास आलेल्या उसाला २०० रुपये आणि यावर्षी गाळपास येणाऱ्या उसाला ३७०० रुपये पहिली उचल द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन अंकुशच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनाची दखल घेऊन शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी ऊस दरासंदर्भात साखर कारखानदार आणि आंदोलन अंकुशची बैठक तात्काळ घेण्यात यावी, असे पत्र साख सहसंचालकांना पाठवले होते त्यानुसार साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी गुरुवारी तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. बैठकीसाठी श्री दत्त साखर-शिरोळ, श्री गुरुदत्त शुगर्स-टाकळीवाडी, श्र शरद साखर-नरंदे, पंचगंग साखर कारखाना-इचलकरंजी जवाहर साखर-हुपरी या पाच कारखान्यांसह आंदोलन अंकुश संघटनेला उपस्थित राहण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे.