कोल्हापूर : ऊसतोडणीसाठी तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार यांनी शेतकऱ्यांकडून खुशालीच्या नावाखाली पैसे घेतल्याची तक्रार अथवा निदर्शनास आल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येईल. शिवाय घेतलेले पैसे ऊसतोडणी, वाहतूक कंत्राटदाराच्या बिलातून कपात करून ते शेतकऱ्यांना देण्यात येतील, असे पत्रक कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे. याबाबत सर्व सर्कल ऑफिसला हे पत्रक फलकावर लावण्यासाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
साखर कारखान्याच्या ऊसतोडणी यंत्रणेकडून शेतकऱ्यांना खुशालीच्या नावाखाली नागवले जात आहे. अशा प्रवृत्तीवर साखर कारखानदार गप्प का, अशी विचारणा शेतकरी करू लागल्याने जिल्ह्यातील बहुतेक कारखान्यांनी खुशालीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. राजाराम कारखान्यानेही याबाबत सर्वच सर्कल ऑफिसला यापूर्वीच कळवले आहे तसेच आज, सोमवारी तसे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. दरम्यान, अनेक ठिकाणी तोडणीसाठी पैसे देवूनही शेतकरी याबाबत तक्रार करत नाहीत. त्यामुळे तोडकरी, वाहतूकदारांचे धाडस वाढत असल्याचे चित्र आहे. कारखान्यांनी आता ठाम भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना बळ मिळणार आहे.