पुणे : रस्त्यावर होणारे ऊस वाहतुकीचे अपघात टाळण्यासाठी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा हंगाम सरू होतानाच कारखान्याकडून प्रत्येक वाहनाला रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यात आलेले आहेत. ऊस वाहतुकीच्या वाहनांमध्ये मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डवर गाणी वाजवली जावू नयेत, अशा प्रकारच्या सूचना वाहनचालकांना देण्यात येतात. कारखान्याकडून ऊस वाहतुकीदरम्यान अपघात टाळण्याकरीता कसोशीने प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले.
येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड व विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि., जुन्नर/आंबेगावच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक जयंत मोरे यांनी रस्ते वाहतुकीच्या नियमांचे परिपत्रकातील नियमांची माहिती सर्व वाहन मालक व चालकांना देवून त्यांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर आणि बैलगाडीला रिफ्लेक्टर व रेडियम बसविण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, मोटार वाहन निरीक्षक जयंत मोरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कोमल गाडेकर, विघ्नहर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी प्रास्ताविक केले. संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अरुण थोरवे यांनी आभार मानले.