लखनौ : उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात जास्त ऊस उत्पादक राज्यांपैकी एक आहे. राज्यात यंदाचा २०२४-२५ हा ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून, राज्य सरकारने उसाची राज्य सल्लागार किंमत (एसएपी) जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार उसाच्या आधारभूत किंमतीत वाढ करू शकते.
राज्याचे ऊस मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी ‘किसान तक’शी बोलताना हे संकेत दिले आहेत. ऊस मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होईल, तेव्हा याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ऊस संशोधन केंद्र आणि तज्ज्ञांचे अहवाल सरकारकडे आले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘किसान तक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, १० ते १५ जानेवारी यांदरम्यान जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होईल, तेव्हा त्यावेळी चर्चेनंतर उसाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. मात्र, उसाच्या आधारभूत किंमतीत किती वाढ केली जाईल, याबाबत कोणतेही वक्तव्य करण्याचे ऊस मंत्री चौधरी यांनी टाळल्याचे दिसून आले.