पुणे – सोमेश्वर साखर कारखाना २८०० रुपये पहिली उचल देणार : अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप

पुणे : सोमेश्वर कारखान्याने गेल्या ५६ दिवसांत चार लाख ७९ हजार टन गाळप करत पाच लाख २६ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. साखर उतारा ११.०५ टक्के इतका जिल्ह्यात सर्वोत्तम आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात पहिली उचल प्रतिटन २८०० रुपयांप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. कारखान्याच्यावतीने हंगाम संपताच प्रतिटन सुमारे ३५० रुपयेप्रमाणे दुसरा हप्ता दिला जाईल. सध्या ३१ डिसेंबरपर्यंत तुटलेल्या ४ लाख २० हजार टन उसाच्या पहिल्या उचलीपोटी सुमारे ११७ कोटींचे बिल एकाच वेळी १० जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले की, एफआरपीच्या नव्या धोरणानुसार सोमेश्वरची पायाभूत एफआरपी १०.२५ टक्के उताऱ्यानुसार २६०५ रुपये असून अंतिम एफआरपी (अंतिम उताऱ्यानुसार) ३१०० ते ३१५० रुपयांच्या आसपास होणार आहे. ही एफआरपी जिल्ह्यात सर्वाधिक असणार आहे. आर्थिक उपलब्धतेचा विचार करून पायाभूत एफआरपीमध्ये १९५ रुपयांची भर घालून प्रतिटन २८०० पहिली उचल देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कारखान्याने आतापर्यंत २ कोटी ९७ लाख युनिट वीजनिर्मिती केली असून त्यापैकी १ कोटी ५६ लाख युनिट वीजविक्री केली आहे. डिस्टिलरीतून २३ लाख लिटर अल्कोहोल तर १४ लाख लिटर इथेनॉलची निर्मिती केली आहे, अशी माहिती पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here