सोलापूर : यंदा उसाचा तुटवडा जाणवत असल्याने सोलापूर जिल्ह्यात वाढीव ऊसदर देण्याची स्पर्धा लागली आहे. येत्या दीड महिन्यातच गाळप हंगाम संपण्याची शक्यता आहे. गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालावा म्हणून ऊस मिळण्याच्या हेतूने सोलापूर जिल्ह्यात वाढीव ऊसदर देण्याची स्पर्धा लागली आहे. जिल्ह्यात बहुतांश साखर कारखानदारांनी सुरुवातीला पहिला हफ्ता टनाला २७०० ऊसदर जाहीर केला. त्यानंतर काही दिवसांनी २८०० केला. आता २८५० पर्यंत दर गेला आहे.
चालू हंगाम चालविण्यासाठी साखर कारखान्यांना ऊस मिळविण्यासाठी कसरत करावी लागेल. उसाची कमतरता आहे. त्यामुळे उसाची पळवापळवी होईल. जो कारखाना उसाला जादा भाव देईल, ऊस उत्पादक शेतकरी अशा कारखान्याला ऊस देतील. यामुळे साखर कारखान्यांना ऊस भावाची स्पर्धा करावी लागणार आहे. गेल्या वर्षी अनेक कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना भाव देण्यास टाळाटाळ केली होती. एकीकडे कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता वाढली तर दुसरीकडे ऊस उत्पादन घटले. ऊस लागणी कमी झाल्या. त्यामुळे जिल्ह्यात २५ ते ३० टक्के ऊस कमी झाला. त्यामुळे गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालवा, यासाठी जास्तीचा ऊसदर देऊन ऊस मिळवण्यासाठीही कारखानदारांची स्पर्धा लागली आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.