सांगली : थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखाना आणि आटपाडी येथील माणगंगा साखर कारखाना यांची विक्री करण्याच्या हालचाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालवल्या आहेत. या दोन साखर कारखान्यांसह एकूण सहा संस्थांकडे बँकेची सुमारे ३५७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. महांकाली कारखाना पुन्हा सुरु करण्यासाठी जिल्हा बँकेने चर्चा करत उपाय शोधले. मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही. माणगंगा कारखाना गेल्यावर्षी सुरू केला. मात्र कारखान्याची मशिनरीच खराब झाल्यामुळे तो प्रयत्नही असफल झाला. म्हणूनच संस्था विक्रीसाठी जिल्हा बँकेचे प्रयत्न आहेत.
थकबाकी वसुलीसाठी रिझर्व्ह बँकेचा दबाब असल्याने जिल्हा बँकेने विक्रीचा कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे असे सांगण्यात आले. यामध्ये आटपाडीतील माणगंगा कारखान्याकडे सुमारे १२५ कोटी रुपये थकीत आहेत. तर कवठेमहांकाळच्या महांकाली कारखान्याकडेही सुमारे १२५ कोटी रुपये थकबाकी आहे. शिवाय डिवाईन फूडसकडे ३६ कोटी, प्रतिबिंब सूतगिरणीकडे १२० कोटी रुपये, विजया लक्ष्मी सूत गिरणीकडे १२ कोटी रुपये आणि शेतकरी विणकर सोसायटीकडे ४९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी संबंधित बहुतांश संस्था राजकीय लोकांशी संबंधित आहेत. या संस्था जिल्हा बँकेने २०२० मध्ये ताब्यात घेतलेल्या आहेत. या थकबाकीमुळे बँक आर्थिक अडचणी येणार आहे. तोटा कमी करण्यासाठी बँकेने वसुलीचा मार्ग स्वीकारत ३१ मार्चपूर्वी एनपीए आराखडा तयार केला आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.