बालाघाट : मध्य प्रदेशातील बालाघाटच्या कटंगी विकास विभागातील सुमारे ४० गावांमध्ये उसाची लागवड केली जाते. या भागात उसाचे चांगले उत्पादन मिळते. शेतकरी या उसापासून गूळ बनवतात. मात्र, शेतकऱ्यांना शेतात ऊस लागवड करण्यापासून ते गूळ विक्रीपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या शेतीमुळे अनेक शेतकरी निराश होत आहेत. शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी प्रती एकर ४० हजार रुपये खर्च येतो. ऊस तोडून तो गुळ बनवण्याच्या कारखान्यात आणला जातो. मात्र, या प्रक्रियेपर्यंत अनेक टप्प्यातंवर अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने शेतकरी ऊस पिकापासून दूरावत चालल्याचे दिसून येत आहे.
न्यूज १८मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उत्पादक शेतकरी गोविंदा गभणे यांनी सांगितले की, ऊस लागवडीत शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उसाचे पीक तयार होते, तेव्हा वन्य प्राण्यांपासून धोका वाढला आहे. डुक्कर आणि माकडे ऊस पिकाची नासाडी करतात. याशिवाय, बालाघाटमध्ये गुळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, शेतकऱ्यांकडे गुळासाठी बाजारपेठ नाही. शेतकऱ्यांना गुळ विक्रीसाठी महाराष्ट्रातील तुमसर बाजारात घेऊन जावा लागतो. यासाठी शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ४०० रुपये खर्च येतो. तिथे अडत बाजारात वेगळे शुल्क आकारले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शेतीबद्दल भ्रमनिरास होत आहे असे पठार संघर्ष समितीचे समन्वयक आणि शेतकरी दीपक पुष्पतोडे यांनी सांगितले.