कोल्हापूर : थेट उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मितीस मंजुरी दिली पाहिजे. इथेनॉलनिर्मिती करणारे कारखाने मोठ्या प्रमाणात उभारले पाहिजेत, असे मत भिलाई पोलाद कारखान्याचे निवृत्त उपमहाप्रबंधक अशोक कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सेनापती कापशी येथे शामराव देसाई लिखित ‘लढा इथेनॉलचा’ व सुजाता देसाई लिखित ‘जिथून पडल्या गाठी’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात ‘चिकोत्रा रिव्हर बेसिन’ प्रोजेक्टच्या प्रारंभ करण्यात आला.
अशोक कुलकर्णी म्हणाले की, इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल व डिझेलमुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. यावर एकमेव पर्याय म्हणजे इंधन म्हणून इथेनॉलच्या वापरास मान्यता देणे गरजेचे आहे, असे कुलकर्णी म्हणाले. शामराव देसाई आणि सुजाता देसाई यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने व पुस्तक लिहीत असताना आलेल्या अनुभवांना मनोगतात उजाळा दिला. उमेश देसाई, ज्येष्ठ पत्रकार बाळ कालेकर, शिवानंद माळी, तुकाराम भारमल, डॉ. प्रकाश चव्हाण, डॉ. मृणालिनी जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. मकरंद कोळी यांनी आभार मानले. अमरसिंह घोरपडे, प्रदीप चव्हाण, सुनील कोले, डॉ. प्रदीप पाटील, दत्तात्रय वालावलकर, डॉ. विठ्ठल पाटील उपस्थित होते.