पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने ३००० ते ३१०० रुपये प्रतिटन दर देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, हिशेबपत्रकांमध्ये काहीतरी गौडबंगाल असल्यानेच अजितदादांनी २८०० रुपये देण्याच्या सूचना केल्या, अशी टीका शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केली. सोमेश्वर कारखान्याने कमी दर जाहीर केला आहे. प्रतिटन २८०० रुपये पहिली उचल देऊन सभासदांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्याबाबत उद्या, ११ जानेवारी रोजी निंबूत येथे आक्रोश सभा आयोजित केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. कोल्हापूरच्या कारखान्यांनी ३२०० ते ३३०० रुपये दर जाहीर केला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या शेजारच्या दत्त इंडियाने ३१०० रुपये उचल दिली. मग, सोमेश्वरचीच उचल २८०० कशी? याबाबत आंदोलन करण्यासाठीची भूमिका ठरविण्याकरिता निंबूत येथे ही आक्रोश सभा होत असल्याचे काकडे यांनी सांगितले.
सतीश काकडे यांनी सांगितले की, कृती समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट घेतली. त्याचदिवशी सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती कारखान्यांचे अध्यक्ष व संचालक यांच्या उपस्थितीत पहिल्या उचलीसंदर्भात चर्चा झाली. मात्र निर्णय न झाला नाही. अजित पवार यांनी तिन्ही कारखान्यांच्या वित्त अधिकारी व कार्यकारी संचालकांना मंगळवारी मुंबईत बोलावले. कृती समितीलाही चर्चेस बोलविले होते. सोमेश्वर कारखान्याची हिशेबपत्रके पाहून २८०० रुपये पहिली उचल देण्यास सांगितले आहे. मात्र, संचालक मंडळाने त्यांच्या बैठकीत पहिली उचल ३००० देण्याची चर्चा केली होती. यामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे असा आरोप काकडे यांनी केला.