पुणे : पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात उत्तर-पूर्व भागात प्रती टन २६०० रुपये तर दक्षिण विभागात २८०० रुपये यांदरम्यान पहिली उचल देण्याची घोषणा केली आहे. गेल्या दोन हंगामात जिल्ह्याील कारखान्यांनी उसाला प्रती टन २९०० ते ३००० रुपये यांदरम्यान उचल दिली होती. मात्र, यंदा साखर कारखानदारांनी वेगळेच धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. परिणामी उसाच्या पहिल्या उचलीबाबत प्रथमच पुणे जिल्हा शेजारील सोलापूर, अहिल्यानगर व सातारा या जिल्ह्यांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. कमी उचल जाहीर केल्याने शेतकरी नाराज आहेत.
पुणे जिल्ह्यात सुरुवातीला दौंडच्या श्रीनाथने व पाठोपाठ दौंड शुगरने २६०० रुपये उचल दिली. आंबेगावच्या भीमाशंकर व जुन्नरच्या विघ्नहर कारखान्यानेही तशाच पद्धतीने दर जाहीर केले आहेत. माळेगाव कारखान्याने पहिली उचल प्रतिटन २८०० रुपये जाहीर केली. हंगाम संपताच प्रती टन ३५० रुपये दुसरा हप्ता दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांनी केली.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू सन २०२४-२५ च्या ऊस गळीत हंगामासाठी ऊस बिलाचा पहिला हप्ता प्रतिटन २८०० रुपयांप्रमाणे जाहीर केला. आज, शुक्रवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले जातील, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली. दरम्यान, सांगली- कोल्हापूरमधील साखर कारखाने ३१०० ते ३२५० रुपये पहिली उचल देऊ केली. सातारा जिल्ह्यातील पहिली उचलही ३१०० ते ३२०० रुपये जाहीर झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही २९०० ते ३००० रुपये पहिली उचल अपेक्षित होती. तसे झालेले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.