जळगाव : खानदेशात मागील चार ते पाच दिवसांपासून ऊस तोडणीला गती आली असून सर्वाधिक गाळप नंदुरबारमधील कारखान्यांनी केले आहे. ऑक्टोबरमध्ये ऊस तोडणी सुरू होणे अपेक्षित होते. पण त्या वेळेसही पाऊस सुरू होता. त्यामुळे ऊस तोडणी काहीशी उशिरा किंवा नोव्हेंबर अखेरीस सुरू झाली. या काळातही अनेक शेतांत वाफसा नसल्याने ऊस तोडणीदेखील रखडत सुरू होती. यानंतर २० ते २५ दिवस ऊस तोडणी गतीने सुरू होती. त्यात डिसेंबरच्या अखेरीस खानदेशात अनेक भागात पाऊस आला. यात ऊस तोडणी रखडली. असे असले तरी सध्या नंदूरबार जिल्हा गाळपात आघाडीवर आहे.
नंदुरबारमध्ये सर्वाधिक सुमारे १४ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टरवर ऊस आहे. धुळ्यातही शिरपूर, साक्री भागात ऊस पीक आहे. यंदा एकूण गाळप २७ ते २८ लाख टनांवर अपेक्षित आहे. ऊस तोडणी वेळेत न झाल्याने वजन व अन्य बाबींवर परिणाम होत आहे. खानदेशात सहा कारखाने सुरू खानदेशात यंदा सहा साखर कारखाने सुरू आहेत. त्यात नंदुरबारमध्ये चार व जळगाव जिल्ह्यात दोन कारखाने सुरू आहेत. जळगावात चोपडा व मुक्ताईनगर येथे तर नंदुरबारमध्ये नवापूर, नंदुरबार, तळोदा व शहादा येथे साखर कारखाने सुरू आहेत. सर्वाधिक गाळप नंदुरबारमधील कारखान्यांनी केले आहे.