सोमेश्वरनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील सोमेश्वर कारखान्याने चालू गाळप हंगामात सभासदांना २८०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर केल्याने सभासदांच्यात नाराजी आहे. याबाबत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सोमेश्वर कारखान्याला भेट दिली. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सुप्रिया सुळे आणि शेतकरी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा केली. सुळे या संचालक मंडळाची चर्चा करणार होत्या; मात्र संचालक मंडळातील एकही सदस्य चर्चेदरम्यान उपस्थित नव्हता. रीतसर पत्र देऊन ऊस दराबाबत अध्यक्ष, संचालक मंडळाची पुन्हा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल. जर संचालक मंडळाने पुन्हा भेट टाळली तर कारखान्याच्या दारात ठिय्या मांडू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला.
खासदार सुळे यांनी कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सुप्रिया सुळेंशी चर्चा केली. कार्यकारी संचालक यादव यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांनी सांगितले की, साखर विक्री मूल्यांकनानुसार झाली आहे. बँकेची उचल २४१० रुपये झाली आहे. इतर उत्पादनातून ३९० रुपये दिले आहेत. गेल्यावर्षी ताळेबंदानुसार ३५७१ रुपये दर दिला होता. आता दिलेला दर अंतिम नसून कारखाना बंद झाल्यावर ३५० रुपये आणखी देण्यात येणार आहेत. संचालक मंडळाची ३१०० रुपये दर देण्याची इच्छा होती; मात्र आर्थिक स्थिती समोर ठेवून दर दिला असल्याचे यादव यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार, पक्षाचे नेते युगेंद्र पवार, तालुका अध्यक्ष एस. एन. जगताप, उद्योजक राजेंद्र जगताप, प्रवीण भोसले, वनिता बनकर, अधिकारी कालिदास निकम, दीपक निंबाळकर, शेती अधिकारी बापूराव गायकवाड आदी उपस्थित होते.