भीमाशंकर कारखान्याकडून थापलिंग खंडोबा मंदिरासाठी ५० लाखांचा निधी देणार : माजी सहकारमंत्री, आमदार दिलीप वळसे-पाटील

पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना श्रीक्षेत्र थापलिंग गडावरील नियोजित खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कारखान्याच्या भाग विकास निधीतून ५० लाख रुपयांचा निधी देणार आहे. माजी सहकारमंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी ही माहिती दिली. वळसे पाटील यांनी सोमवारी गडावर येऊन खंडोबा देवाचे दर्शन घेऊन तळी भंडार केला. पौष पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र थापलिंग गडावर यात्रेवेळी त्यांनी नवसाचे बैलगाडे पाहण्याचा आनंद घेतला. देवस्थानतर्फे अध्यक्ष देवदत्त निकम व सचिव डी. एन. पवार यांच्या हस्ते वळसे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार दिलीप वळसे पाटील म्हणाले, थापलिंग खंडोबा हे आपले श्रद्धास्थान आहे. आमदार, मंत्री म्हणून काम करत असताना आपण शासकीय निधीतून कामांसाठी निधी मंजूर करून आणला. आता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भाग विकास निधीतून ५० लाख रुपयांचा निधी देणार आहे. यावेळी विष्णू हिंगे, विवेक वळसे पाटील, संजय गवारी, प्रकाश घोलप, दत्ता थोरात, अशोक आदक, सुहास बाणखेले, रमेश खिलारी, सचिन पानसरे, शिवाजीराव लोंढे, वैभव उंडे आदी उपस्थित होते. सरपंच गणेश यादव, उपसरपंच सुनील शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here