कोल्हापूर : साखर कारखान्यांकडून ऊस उचलण्यात होणाऱ्या उशिरामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्यावर्षीच्या महापुराच्या पाण्यात सापडून खराब झालेला ऊस अद्याप शेतात आहे. साखर कारखान्यांनी खोडवा ऊस देखील उचल केलेला नाही. शेतातील उभा ऊस वाळून चालला असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. बुडालेल्या उसाचा उग्र दर्प आणि शेतातील अडचणींमुळे काम करणे अशक्य झाले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बुडून ऊस खराब झाल्यामुळे साखरेचा दर्जा कमी होत असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बसणार आहे.
याबाबत शेतकरी प्रभाकर बंडगर म्हणाले, महापुरात नुकसान झालेला ऊस शेतातच सडत आहे. ऊस तोडणीला उशीर झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था गंभीर बनली आहे. सरकार आणि कारखान्यांनी तातडीने पावले उचलून शेतकऱ्याला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढावे. तर शिरोळ तालुका ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी कारखान्यांनी त्वरित पावले उचलली पाहिजेत. महापुरामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत उचलणीस उशीर होणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली.