नवी दिल्ली : चालू गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये देशातील साखरेचे १५ जानेवारीपर्यंतचे उत्पादन १३०.५५ लाख टनांवर पोहोचले आहे. मागील वर्षी समान कालावधीत हे उत्पादन १५१.२० लाख टन होते. त्यामुळे देशातील साखरेचे उत्पादन गत हंगामाच्या तुलनेत २०.६५ लाख टन किंवा १३.६६ टक्क्यांनी घटले असल्याचे नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF ) च्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. हंगामाच्या अखेरीस साखर उत्पादन अंदाजे ५० लाख टनांनी घटण्याची शक्यता आहे. ऊस पिकावरील रोग आणि प्रतिकूल हवामानाचा साखर उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.
देशात गेल्यावर्षी ३१९ लाख टन साखर उत्पादन झाले होते. चालू हंगामात हे उत्पादन २७० लाख टन होईल असा अंदाज आहे. साखर उत्पादनाची ही आकडेवारी इथेनॉल उत्पादनासाठी वळवलेल्या साखरेव्यतिरिक्त आहे. गेल्यावर्षी ५२४ कारखान्यांने कार्यरत होते. तर यंदा ५०७ साखर कारखाने सुरु आहेत. उसावर लाल सड कुजणे व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शिवाय, हिवाळा उशिरा सुरू झाल्याने साखर कारखाने सुरू होण्यास उशीर झाला. साखरेचा उतारा घटला आहे. उत्तर प्रदेशमध्ये १५ जानेवारीपर्यंतचे उत्पादन गेल्यावर्षीच्या ४६.१० लाख टनांवरून घटून ४२.८५ लाख टन झाले आहे. १५ जानेवारीपर्यंत देशाचा साखर उतारा ८.८१ टक्के आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत तो ९.३७ टक्के होता. साखरेच्या रिकव्हरीमध्ये सर्वात जास्त घसरण कर्नाटकमध्ये दिसून आली आहे. गेल्या वर्षीच्या ९.६० टक्के वरून रिकव्हरी ८.५० टक्के वर घसरली आहे. दरम्यान, साखरेचा किमान विक्री दर व इथेनॉलचा दर वाढविण्याची गरज या उद्योगातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.