अहिल्यानगर : जिल्ह्यात जवळपास दोन महिन्यानंतर ऊस दराची कोंडी फुटली आहे. प्रवरानगरचा पद्मश्री विखे सहकारी साखर कारखाना वगळता इतरांनी पहिला हप्ता तीन हजार रुपयांच्या आतच जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. साखर कारखाने ऊस उत्पादकांना किमान ३ हजार ४०० रुपये दर जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. परंतु एकाही कारखान्याने पहिली उचल तीन हजारांवर गेली नाही. अहिल्यानगर जिल्ह्याचा उताराही पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांखालोखाल असतो. साधारणपणे १०.५०पासून तो ११.५० त्याची सरासरी आहे. त्यामुळे साखर उताऱ्यानुसार शेतकऱ्यांना दर मिळायला हवा. मात्र,कारखान्यांकडून तसे होताना दिसत नाही.
दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जिल्ह्यातील प्रवरानगरच्या पद्मश्री विखे सहकारी साखर कारखान्याने ३,००० रुपये दर जाहीर केला आहे. तर काळे सहकारी साखर कारखाना, थोरात सहकारी साखर कारखाना, अंबालिका साखर कारखाना, कोल्हे सहकारी साखर कारखाना या चार कारखान्यांकडून २८०० रुपये दर जाहीर झाला आहे. त्यापाठोपाठ अशोक सहकारी साखर कारखाना, अगस्ती सहकारी साखर कारखाना, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना या तीन कारखान्यांनी २ हजार ७०० रुपये दर जाहीर केला आहे. शेतकरी संघटना आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यातील कारखान्यांचा साखर उतारा अहिल्यानगरपेक्षा कमी असतो. तरीही तेथील कारखाने आपल्यापेक्षा जास्त दर देतात. येथील कारखाने उपपदार्थांची निर्मिती करतात. मग त्यांना तीन हजारांवर दर देणे सहज शक्य आहे. मात्र, तसे न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
हे सुद्धा वाचा: शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.