कोल्हापूर : दौलत साखर कारखान्याची थकबाकी निश्चित करण्यासाठी सात सदस्यांची समिती स्थापन

कोल्हापूर : दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृतानुसार, चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या थकबाकीची रक्कम निश्चित करण्याकरिता साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. दौलत कारखान्याने राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय सहकार विकास निगमने मिळकती जप्त करण्याबाबत अर्ज केला आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी नियुक्त समिती दोन महिन्यांत सरकारला अहवाल सादर करेल.

या प्रकरणात यापूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या तडजोडीनंतर राष्ट्रीय सहकार विकास निगमला दौलत कारखाना व राज्य सरकारकडून व्याजासह ७७ कोटी ८५ लाख ८९ हजार ७२१ रुपये देण्याचा निर्णय २६ फेब्रुवारी २००८ रोजीच्या शासन आदेशानुसार झाला होता. कारखान्याने वनटाईम सेटलमेंट अंतर्गत ३६ कोटी २२ लाख ४८ हजार इतकी रक्कम द्यायची होती. यापैकी ६ वर्षांत १२ हप्त्यांत ३ कोटी १८ लाख ७३ हजार इतकी परतफेड होणे अपेक्षित होते. कारखान्याने एकूण १२ कोटी ७ लाख ९२ हजार रक्कम भरली. त्यामुळे २४ कोटी १९ लाख रक्कम कारखान्याकडे थकीत राहिली आहे. आता सहकार विभागाने थकबाकी निश्चितीसाठी समिती स्थापन केली असून साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमणार समितीचे अध्यक्ष आहेत. साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी, एनसीडीसीचे विभागीय संचालक कर्नल विनीत नारायण, प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे, दौलत कारखान्याचे कार्यकारी संचालक, विशेष लेखापरिक्षक डी. एन. पवार, सहसंचालक (अर्थ) अविनाश देशमुख यांचा समितीत समावेश आहे.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here