पुणे : राज्यात यंदाच्या हंगामात, आत्तापर्यंत ४७० लाख ३ हजार टन उसाचे गाळप झाले असून, ४१३ लाख ५८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सर्वाधिक साखरेचे उत्पादनात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली आहे. तर पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर विभागात साखर उतारा सर्वाधिक म्हणजे १०.३९ टक्के एवढा आहे. काही दिवसांमध्ये साखरेचा उतारा वाढण्याची शक्यताही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पुणे विभागात ऊस गाळपाने जोर पकडला आहे. बदलत्या हवामानामध्ये पुणे विभागात ११४ लाख ९२ टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ८.८८ टक्क्याच्या उताऱ्यानुसार १०२ लाख ३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पुणे जिल्ह्यामध्ये गाळप हंगाम घेणाऱ्या १४ कारखान्यांमध्ये सहकारी कारखान्यांना खासगीच्या तुलनेत जास्त उतारा मिळाला आहे. सहकारी कारखान्यांना ९.९९ टक्के साखरेचा उताऱ्याने ३० लाख ६ हजार १८५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. खासगी कारखान्यांना ७.४९ टक्क्यांच्या उताऱ्याने २३ लाख १४ हजार ९२९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या चौदा कारखान्यांमध्ये सोमेश्वर सहकारी कारखान्याने ११.०३ टक्के इतका सर्वाधिक साखर उतारा मिळवून आघाडी घेतली आहे. विभागात १३० ते १४० दिवस यावर्षीचा ऊस गाळप हंगाम सुरु राहणे अपेक्षित आहे. दरम्यान, राज्यात सर्वाधिक कमी नागपूर विभागात केवळ तीन खासगी कारखाने सुरू असून, एक लाख १२ हजार टन उसाचे गाळप झाले असून ५३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.