पुणे : आगामी काळात इथेनॉलचे उत्पादन हे धान्याचा वापर करून वर्षभर घेता येणार आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनी सध्याच्या आसवानी प्रकल्पांचे मल्टिफीड मध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे, असे आवाहन राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. १७) पुणे येथे साखर संकुलमध्ये देशातील इथेनॉल उत्पादन वाढीसाठी कोणती पाऊले उचलावीत, यावर विचार विनिमय करण्यासाठी देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणारे अधिकारी व तज्ज्ञांची बैठक झाली. बैठकीस साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपसचिव सुरेशकुमार नायक, केंद्रीय सहकारिता मंत्रालयाचे संचालक डी. के. वर्मा, एनसीडीसीचे संचालक गिरीराज अग्निहोत्री, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, साखर सह संचालक (उपपदार्थ) अविनाश देशमुख व अन्य अधिकारी तसेच गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्रातील मिळून ४३ कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, देशातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुमारे मार्च – एप्रिल पर्यंत चालतात; मात्र त्यानंतर इथेनॉलचे उत्पादन चालू ठेवायचे असेल तर ते धान्यावर चालवावे लागणार आहे. मका हे कमी पाण्यात व तिन्ही हंगामात येणारे पीक यासाठी उपयुक्त ठरते. केंद्रीय सहकार मंत्रालयाने सहकार क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्याचा आणि त्याद्वारे अन्न धान्य विशेषत मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन घेतल्यास कारखान्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत मिळेल. देशातील ऑइल कंपन्या याबाबत साखर कारखान्यांशी दीर्घ मुदतीचे करार करण्याबाबत अनुकूल आहेत. उत्पादित इथेनॉलची खरेदी सहकारी आसवनींकडून प्राधान्याने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली.
इथेनॉल इंडस्ट्रीच्या संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.