नवी दिल्ली : देशातील मागील वर्षीचा शिल्लक साखर साठा, चालू वर्षातील साखरेचे नवीन उत्पादन व देशातील साखरेचा खप याचा आढावा घेऊन केंद्र सरकारने १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी देणार आहे. या निर्णयाने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य साखर संघ, वेस्टर्न महाराष्ट्र शुगर मिल असोसिएशन (विस्मा ), ‘इस्मा’ व राष्ट्रीय साखर संघाने चालू हंगामात साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालवला होता. त्याला यश मिळाले आहे.
साखर निर्यातीबाबत संघटनांनी जोरदार मागणी केल्यानंतर केंद्र सरकार याबाबत निर्णय घेण्याची शक्यता होती. त्याचा परिणाम देशांतर्गत साखरेच्या दरावर होऊन गेल्या दोन दिवसांपासून देशांतर्गत साखरेच्या प्रतिक्विंटल दरात १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. निर्यातीनंतरही साखर बाजारात तेजी राहण्याची शक्यता असून, त्यामुळेही कारखान्यांना दिलासा मिळणार आहे. साखर निर्यातीमुळे चालू हंगामात देशांतर्गत वापरासाठी योग्य साठा आणि इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम (ईबीपी) सुरळीत ठेवण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय साखर कारखान्यांची आर्थिक तरलता राखण्यात मदत होऊन शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेवर आदा करण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने इथेनॉलच्या निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला प्रतिकिलो २८ रुपये दराचा २४ लाख टन तांदूळ प्रतिकिलो २२.५० रुपये दराने देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे.
Nice