पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने साखर हंगामातील कामगिरीचे मूल्यमापन करत सन २०२३-२४ च्या हंगामातील संस्थात्मक व वैयक्तिक पुरस्कार मंगळवारी जाहीर झाले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली येत्या गुरुवारी (ता. २३) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. याप्रसंगी संस्थेतर्फे साखर उद्योगातील दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने कै. शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन’ हा सर्वोच्च पुरस्कार सोमेश्वर कारखान्याला जाहीर झाला आहे. याशिवाय ‘उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमते’चा मध्य विभागातील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आणि राज्य पातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट फायनान्स मॅनेजर हा वैयक्तिक पुरस्कारही सोमेश्वरला मिळाला आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास सन २०२३-२४ करिता मध्य विभागातील ‘सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार’ जाहीर झाला. तांत्रिक कार्यक्षमता विभागातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार व्यंकटेश कृपा शुगर मिल्स साखर कारखान्यास जाहीर झाला.