‘व्हीएसआय’कडून कृष्णा कारखान्याला सवोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

सातारा : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) या संस्थेच्यावतीने सन २०२२-२३ या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे.

साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा संस्थेतर्फे नुकतीच करण्यात आली. गेली १० वर्षे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना उत्कृष्ट वाटचाल करत आहे. कृष्णा कारखान्याने सन २०२२-२३ या गळीत हंगामात एकूण उत्पादन प्रक्रियेचा खर्च (६००.२० रुपये प्रति किंटल) हा राज्याच्या सरासरी साखरेच्या एकूण उत्पादन प्रक्रियेच्या खर्चापेक्षा (८०५.०४ रुपये प्रति किंटल) कमी ठेवत, उत्कृष्ट नफा निर्देशांक राखला आहे.

कारखान्यातील साखरेचा प्रति किंटल रोखीचा उत्पादन प्रक्रिया खर्च (४४६.७९ रुपये प्रति किंटल) हा राज्याच्या सरासरी प्रति क्विंटल रोखीच्या उत्पादन प्रक्रिया खर्चापेक्षा (५४१.९२ रुपये प्रति क्विंटल) कमी आहे. याशिवाय खेळत्या भांडवलावरील व्याजाचा खर्चदेखील (८३.१० रुपये प्रति क्विंटल) हा राज्याच्या सरासरी साखरेच्या प्रति किंटल खेळत्या भांडवलावरील व्याजाच्या खर्चापेक्षा (१०९.८० रुपये प्रति क्विंटल) कमी राखत सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत व्हीएसआयने सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कृष्णा कारखान्याला जाहीर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here