कोल्हापूर : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्यातर्फे दिवंगत आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जाहीर झाला. गळीत हंगाम हंगाम २०२३-२४ साठी हा पुरस्कार जाहीर झाला. एकाच हंगामात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळविण्याचा मान शाहू कारखान्याने पटकावला आहे. पुणे येथे दि. २३ रोजी शानदार सोहळ्यात व्हीएसआयच्या पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल.
‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांनी या पुरस्कार निवडीचे पत्र कारखान्यास पाठवले, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी दिली.] राष्ट्रीय व राज्य पातळीवर एकूण मिळालेल्या पुरस्कारांमध्ये कारखान्यास मिळालेला हा ७२वा पुरस्कार आहे. यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील २७ तर राज्य पातळीवरील ४५ पुरस्कारांचा समावेश आहे. कारखान्याने सभासद शेतकऱ्यांसाठी वीसहून अधिक विविध ऊस विकास योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमही राबविले आहेत. त्याचीच दखल घेऊन कारखान्यास हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे शाहू साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच शाहू साखर कारखाना परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.