नवी दिल्ली : सोमवारी जागतिक स्तरावर साखरेच्या किमती गेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त काळाच्या नीचांकी पातळीवर आल्या. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखर उत्पादक देश असलेल्या भारताने चालू हंगामात १० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. देशातील साखर कारखान्यांना आणि स्थानिक साखरेच्या किमतींना आधार देण्यासाठी सरकारने निर्यातीला परवानगी दिली आहे. निर्यातीला परवानगी दिली जाईल अशी अटकळ अनेक आठवड्यांपासून लावली जात होती. मात्र, या निर्णयाने काही व्यापाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण गेल्या आठ वर्षांत प्रथमच या हंगामात वापरापेक्षा साखरेचे उत्पादन कमी असण्याची शक्यता आहे.
याबाबत आयएनजीचे कमोडिटी स्ट्रॅटेजी प्रमुख वॉरेन पॅटरसन यांनी सांगितले की, या वृत्तामुळे जागतिक किमतींवर दबाव राहण्याची शक्यता आहे. आयसीई एक्सचेंजवरील पांढऱ्या साखरेचा वायदा, जो स्वीटनरच्या किमतीसाठी जागतिक बेंचमार्क म्हणून वापरला जातो, तो यापूर्वी प्रति टन ४७०.२० डॉलरवर पोहोचला होता. हा सप्टेंबर २०२१ नंतरचा सर्वात कमी दर होता. नंतर तो १ टक्क्याने घसरून ४७३.६० प्रति टन झाला. त्यामुळे वर्षभरातील तोटा ५ टक्यापेक्षा जास्त झाला आहे.
अमेरिकेतील सुट्टीमुळे कच्च्या साखरेचा वायदा व्यवहार झाला नाही. परंतु शुक्रवारी तो १ टक्याने घसरून १८.२२ सेंट प्रति पौंडवर बंद झाला. देशातील आघाडीच्या व्यापारी संस्थांच्या मते, भारताचे उत्पादन गेल्या वर्षीच्या ३२ दशलक्ष टनांवरून सुमारे २७ दशलक्ष टनांपर्यंत घसरू शकते. आणि हे उत्पादन वार्षिक २९ दशलक्ष टन खपापेक्षा कमी आहे. गेल्या हंगामात भारत सरकारने निर्यातीला परवानगी दिली नाही.
युरोपमधील एका साखर उद्योग तज्ज्ञाने रॉयटर्सला सांगितले की त्यांना या हंगामात भारतात सुमारे २७ दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. परंतु एका आघाडीच्या व्यापारी समुहाने उत्पादन खूप जास्त असेल, असा दृष्टिकोन मांडसा आहे. दरम्यान, भारतातील साखर कारखान्यांना आशा आहे की पुढील हंगामात उत्पादनात सुधारणा होईल.
यावर्षी साखरेच्या किमतींवरही दबाव आला आहे. कारण, चीनला सीरप निर्यात थांबल्यामुळे थायलंडकडे विक्रीसाठी जास्त साखर असण्याची शक्यता आहे. आग्नेय आशियाई देशातून साखरेच्या पाकात आणि प्रीमिक्स पावडरच्या निर्यातीवर गेल्या महिन्यात लादलेली बंदी उठवण्यासाठी चर्चा सुरू करण्यापूर्वी चिनी अधिकाऱ्यांनी थायलंडला डझनभर कारखान्यांची तपासणी करण्यास सांगितले आहे. इतर सॉफ्ट कमोडिटीमध्ये लंडन कोकोचा भाव ०.६ टक्के घसरून ९८,९०५ डॉलर प्रति टन झाला, तर रोबस्टा कॉफीचा भाव १ टक्का वाढून ५,०५७ डॉलर प्रति टन झाला.