मंचर : राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर असणाऱ्या, मांजरी बुद्रूकच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास सन २०२३ – २४ करीता मध्य विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर झाला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सफभेत माजी केंद्रीय कृषीमंत्री व संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, (दि. २३) सकाळी साडेदहा वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाला साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
राज्यातील २०२३ – २४ गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा मंगळवारी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. ते म्हणाले की, संस्थापक, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस बेणेबदल आणि बेणेमळा योजनेवर भर दिला आहे एक डोळा पध्दतीने ऊस रोप लागवड, ठिबक सिंचन वाढीसाठी प्रयत्न, माती व पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध, हुमणी कीड नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करणे, जैविक खते निर्मिती प्रकल्पामार्फत जैविक खते पुरवठा, खोडवा पीक व्यवस्थापनावर जास्तीत जास्त भर, कृषी कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षण, कृषी निविष्ठांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा, पाचट कुट्टी करण्यासाठी विशेष प्रयत्न असे उपक्रम राबवले आहेत. त्याची दखल घेऊन व्हीएसआयने पुरस्कार दिला आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहे.