इस्लामपूर : या परिसरातील शेतकऱ्यांना आता उसाच्या फडास लागणाऱ्या आगीची समस्या मोठी चिंता भेडसावू लागलेली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आधीच वाढता उत्पादन खर्च व मिळणारा अल्प दर यामुळे आर्थिक चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्याची आणखी कोंडी होताना दिसून आली आहे. तोडणी मजुरांनी शेतकऱ्यांकडून, ऊस फड मालकाकडून पैसे घेऊ नयेत हा साखर आयुक्तांनी तीन वर्षांपूर्वी दिलेला आदेश कागदावरच आहे. या वर्षीही मजुरांकडून, तोडणी यंत्र चालकांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरूच आहे.
सांगली जिल्ह्यात उसाच्या फडाला लागणाऱ्या आगीचे प्रमाण वाढत आहे. येथे चार दिवसांत ऊस तोड येणार, या आनंदात असणाऱ्या शेतकऱ्याच्या उसाच्या फडास अचानक आग लागल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरते. त्यावेळी तो ऊस उत्पादक शेतकरी पूर्णपणे उन्मळून पडतो. महावितरण’च्या लटकणाऱ्या वीज वाहक ताऱ्यांमध्ये होणारे स्पर्किंग तर काही शेतकरी आपला ऊस तोडून कारखान्यास पाठवल्यानंतर पालापाचोळा पेटवतात. अशा वेळी काळजी न घेतल्यास शेजाऱ्याचा उभा ऊस कित्येक वेळा पेटला जातो. किरकोळ भांडणाच्या कारणावरून एकमेकांचा सूड घेण्यासाठी काही जण ऊस फडास आग लावण्याचा प्रयत्न करतात अशी स्थिती आहे. याबाबत वाळवा तालुक्यातील कुरपळ येथील शेतकरी शिवाजी पाटील म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून उसाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच उत्पादन खर्च भरमसाठ वाढलेला आहे. त्यातच तोडणी यंत्रणेकडून होणारी लुबाडणूक वाढली आहे. सरकारने ती थांबवावी.