पुणे : गेल्या दोन वर्षांपासून न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखाना बंद आहे. त्यामुळे कारखान्याच्या सुरक्षा कामगारांचे पगार कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून व सभासदांच्या लोकवर्गणीतून गोळा करून दिले जाणार आहेत. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रवींद्र काळे, भाजपचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी ही माहिती दिली. कारखाना बंद असल्याने सर्वच यंत्रणा ठप्प आहे. काही दिवसांपूर्वी कारखान्याच्या किमती आठ मोटर्स, टायर, बैलगाडीच्या साहित्यांची चोरी झाली. कारखान्याचे प्रशासन सुरक्षारक्षकांना वेळेत पगार करत नसल्याने संबंधित कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने काही सुरक्षारक्षक काम सोडून गेले आहेत.
याबाबत पत्रकार परिषदेत माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी सांगितले की, आता केवळ तीनच सुरक्षारक्षक कारखान्याचे दिवस-रात्र संरक्षण करत आहेत. कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांचे कारखाना कार्यस्थळाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. सुरक्षारक्षकांचे पगार देणे गरजेचे असतानाही संचालक मंडळ कुठलीच जबाबदारी स्वीकारत नाही. थकीत वीज बिलामुळे वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे कारखान्यावर रात्री अंधार असतो. या कामगारांना आम्ही मदत करणार आहोत. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोरेकर, राहुल पाचर्णे,सुधीर फराटे, अनिल शेलार, दादासाहेब कोळपे, सुभाष कांडगे, श्रीनिवास घाडगे, कामगार नेते तात्यासाहेब शेलार आदी उपस्थित होते.