कोल्हापूर : गुजरात बाजारपेठेत ‘कोल्हापुरी’ गुळाला मागणी वाढली असून त्याचा दरावरही परिणाम दिसत आहे. थंडीत गुळाला मागणी वाढते. सध्या गुजरातमध्येही थंडी वाढल्याने गुळाला मागणी वाढली आहे. दर वधारण्यामागे हेही कारण आहे. गुजरात बाजारपेठेत कर्नाटकातील गुळात साखरेच्या गाठी आढळल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अलीकडे गुळाची चव व रंग चांगला येण्यासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. कोल्हापुरी गुळातही काही प्रमाणात साखर मिसळली जाते. मात्र, तुलनेत कमी असते. त्यामुळे कोल्हापुरी गुळाला प्राधान्य दिले जात आहे. सध्या बाजारात गुळाचा दर ३९०० ते ४८०० रुपये यांदरम्यान आहे.
गेल्या पाच- सात वर्षांपासून ‘कोल्हापुरी गुळासमोर कर्नाटकातील गुळाने चांगलेच आव्हान उभे केले. पण कर्नाटकातील गुळात साखरेचे प्रमाण अधिक असते. त्याचा टिकाऊपणा कमी असतो. त्याचबरोबर गुळात साखरेच्या गाठी सापडू लागल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांच्या आहेत. याऊलट कोल्हापुरी गुळ कसदार मातीमधील असतो. दरम्यान, कर्नाटकातील काही गुऱ्हाळघर चालक सहा महिन्यांच्या उसाचेही गुऱ्हाळघरात गाळप करतात. त्यात निम्मी साखर मिसळून गूळ तयार केला जातो. त्यामुळे गुळाचा टिकाऊपणा येत नाही.