सांगली : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि मिरजच्या तहसीलदारांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे तपासण्यासाठी वैद्यमापन भरारी पथके तयार केली आहेत. यापैकी एका पथकाने येथील वसंतदादा साखर कारखाना चालवत असलेल्या श्री दत्त इंडिया कंपनीच्या कारखान्याचे सर्व वजन काटे वैद्यमापन भरारी पथकाने मंगळवारी अचानक तपासले. या वजन काट्याची दोनवेळा तपासणी झाली आहे. वजन अचूक असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपला ऊस जिल्ह्यातील कोणत्याही वजन काट्यावरून वजन करून आणल्यास तोसुद्धा स्वीकारला जाईल, असे दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी सांगितले.
मंडल अधिकारी विनायक यादव, निरीक्षक वैद्यमापन अक्कोळकर, शिवाजी खरात, विशेष लेखा परीक्षक प्रकाश देसाई, अरुण सोनार, संजयनगर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार एकनाथ करांडे, अमित जाधव आदींच्या भरारी पथकाने ही तपासणी केली. दत्त इंडिया कारखाना कार्यस्थळावर अचानक भेट देऊन वजन केलेल्या वाहनाचे परत वजन काट्यावर आणून फेरतपासणी केली. त्यामध्ये कोणताही दोष व फरक आढळलेला नाही. सर्व वजन काटे अचूक असल्याचा लेखी अहवाल वैद्यमापन भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्याला दिला. कारखान्याचे केन मॅनेजर मोहन पवार, केनयार्ड सुपरवायझर सुनील अवटी, संजय पवार, ऑफिस सुपरिटेंडेट दीपक शिंदे, कामगार युनियन सेक्रेटरी प्रदीप शिंदे, युनियन अध्यक्ष दिलीप गोरे आदी उपस्थित होते.