पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने २०२३-२४ या गळीत हंगामाकरिता देण्यात येणारा ‘उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार’ मांजरा परिवारातील बेलकुंडच्या संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याने पटकाविला आहे. ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २३) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यात उसाची लागवड कमी असल्याने बरेचसे कारखाने लवकर बंद होत आहेत. काही ठिकाणी गाळप अंतिम टप्प्यात असून राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. लातूरच्या मांजरा साखर कारखान्याने १०० टक्के हार्वेस्टरद्वारे ऊसतोड केली आहे. त्यांना जमले तर मग तुम्हांला जमत नाही, असा सवाल करत येणाऱ्या काळात मांजरा साखर कारखान्याचा हार्वेस्टर ऊस तोडणी पॅटर्न सर्वांनी राबवावा, असे आवाहन अजित पवार यांनी या समारंभात केले.
यावेळी दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार विशाल पाटील, साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, ‘वसंतदादा शुगर’चे महासंचालक संभाजी कडू पाटील, शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते. कारखान्याचे चेअरमनशाम भोसले यांच्यासह व्हाइस चेअरमन सचिन पाटील, संचालक गणपतराव बाजुळगे, संचालक शाम साळुंके, सुभाष जाधव, गोविंद सोनटक्के, संतोष भोसले, बाबासाहेब गायकवाड, विलास काळे, अमित माने, रमेश वळके आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.