पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यास मध्य विभागातून द्वितीय क्रमांकाचा ‘तांत्रिक कार्यक्षमता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिलेला पुरस्कार कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण आणि कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी स्वीकारला.
कार्यकारी संचालक सुनील कोल्हे म्हणाले, कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे व अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन गळीत हंगामांत व्यत्यय न येता, कारखान्याचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात आधुनिकीकरण व विस्तारीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. त्यामुळे मिलमधील उसाचा तंतुमय निर्देशांक ८८.२० टक्के, रेड्युस मिल एक्सट्रॅक्शन (आरएमई) ९६.२० टक्के, प्रायमरी एक्सट्रॅक्शन ७४.५० टक्के, बगॅस बचत ८.५४ टक्के, साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या स्टीमचा वापर ३५ टक्क्यांवर गेला. साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या विजेचा वापर २४ किलो वॅट प्रति मेट्रिक टन व गाळप बंद कालावधीचे प्रमाण ०.३८ टक्के राखले. सर्व तांत्रिक निकष तंतोतंत पाळल्याने हा पुरस्कार मिळाला.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे म्हणाले कि, शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यास मध्य विभागातून द्वितीय क्रमांकाचा ‘तांत्रिक कार्यक्षमता’ पुरस्कार मिळाला. . एका अर्थाने हा कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक, संचालक मंडळ आणि कामगारांचा देखील सन्मान आहे. सभासदांनी एकमुखाने विस्तारीकरण व आधुनिकीकरणास पाठबळ दिले. पुरस्कारामुळे ही दोन्ही कामे उत्तम झाली यावर मान्यतेची मोहोर उमटली.