पुणे : गेल्या तीन ते चार वर्षांपासून साखरेची MSP (विक्री दर) वाढलेला नाही. शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी एमएसपी वाढण्याची गरज आहे. या संदर्भात केंद्र सरकारसोबत बोलणे सुरू आहे. लवकरच याविषयी निर्णय होईल. साखरेची मागणी आणि दरही वाढणार आहे. त्यामुळे कारखान्यांनी साखर विक्रीसाठी घाई करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. गुरुवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४८व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेत वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार अहिल्यानगर मधील अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याला देण्यात आला. MSP बरोबर इथेनॉल दरवाढीसंदर्भातही केंद्राला विनंती करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे, असे पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, सध्या साखरेला मिळणारा दर कमी आहे. आगामी रमजान सणामुळे जगभरात साखरेची मागणी आणि दरही वाढतील. काही कारखाने शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यासाठी तातडीने साखर विकतात. त्यामुळे दर कोसळतात. या कारखान्यांमुळे इतरांना तोटा सहन करावा लागतो. शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी कारखान्यांना साखर विक्रीची गरज असली तरी घाई करू नये. आर्थिक शिस्त पाळावी. केंद्र सरकारने दहा लाख टन साखर निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. त्यातील पावणेचार लाख टन कोटा राज्यासाठी उपलब्ध झाला आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी सुधारेल. राज्याचा कृषी, ऊर्जा, उत्पादन शुल्क व सहकार हे चार विभाग साखर कारखानदारीसाठी एकत्र काम करीत आहेत. यावेळी व्हीएसआचे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.