कोल्हापूर : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे ‘दत्त-शिरोळ’ला सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन प्रथम

कोल्हापूर : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ यांनी सन २०२३-२४ मध्ये ऊस विकास योजनेंतर्गत केलेल्या विविध उपक्रमाबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार कारखान्याच्या वतीने उद्यानपंडित गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमन शरदचंद्र पाठक व सर्व संचालकांनी स्वीकारला.

ऊस विकास योजनेंतर्गत कारखान्याच्या वतीने ऊस बियाणे बदलावर भर देऊन ऊस विकास योजनेसाठी अंदाजपत्रकामध्ये कारखान्याने निधीची तरतूद केलेली आहे. कारखान्याच्या वतीने एक डोळा रोपे लागवडीचा उपक्रम मोठ्या प्रमाणात वापरलेला असून, शेतकरी तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत भर दिलेला आहे. एकरी उसाचे उत्पन्न वाढावे यासाठी वेळोवेळी शेतकरी मेळावे व प्रशिक्षण शिबिर यांचे आयोजन कारखान्यामार्फत केले जाते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी तसेच सेंद्रिय ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी झेप एकरी २०० मे. टन सारखे उपक्रम राबविले जातात.

पूर परिस्थितीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना नदीबुड क्षेत्रात शुगर बीट, उन्हाळी सोयाबीन, पेरू, चिकू लागवड असे नवनवीन पर्याय कारखान्याकडून उपलब्ध करून दिले आहेत. कारखान्याच्या वतीने स्वतंत्र माती परीक्षण प्रयोगशाळा कार्यान्वित असून, ती शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असते. क्षारपड जमीन सुधारण्याचा दत्त पॅटर्न संपूर्ण देशभरात गाजत असून, कारखाना कार्यक्षेत्रातील जवळपास दहा हजार एकर क्षेत्र क्षारपड मुक्त झाले आहे.

यावेळी संचालक अरुण कुमार देसाई, श्रीमती विनया घोरपडे, बाबासो पाटील, इंद्रजित पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू माने-गावडे, सिदगोंडा पाटील, संगीता पाटील-कोथळीकर, अस्मिता पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, ए. एस. पाटील, विलास माने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here