कोल्हापूर : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार आसुर्ले पोर्ले येथील दत्त दालमिया साखर कारखान्याने पटकावला. पुण्यात गुरुवारी व्हीएसआयमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कंपनीचे युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आपल्या गाळप क्षमतेचा ११० टक्के वापर केल्याबद्दल कारखान्याला गौरविण्यात आले, अशी माहिती युनिटहेड रंगाप्रसाद यांनी दिली.
दत्त दालमिया साखर कारखान्याने आपल्या क्षमतेचा सर्वोत्कृष्ट वापर केला आहे. कारखान्याने रिट्यूड मिल एक्स्ट्रेक्शन अर्थात आरएमईचा ९६.१७ टक्के, कारखान्यामधील उसाचा तंतुमय निर्देशांक ८८.४० टक्के, बगॅसमधील आर्द्रतेचे प्रमाण ४८.४० टक्के, साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा वापर ३४.८९ टक्के आणि गाळप क्षमतेचा वापर ११० टक्के केला. तांत्रिक कार्यक्षमतेचे सर्व निकष पूर्ण केल्याने हा पुरस्कार मिळाल्याचे युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांनी सांगितले. या पुरस्काराबद्दल कारखान्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.