नाशिक: निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी चांदोरीत ऊसतोडणी करणाऱ्या कष्टकरी महिलांबरोबर हळदी-कुंकवाचा सण साजरा केला. ऊसतोडणी महिलांसाठी तो क्षण एक अनपेक्षित आनंदाचा सोहळा ठरला. ऊसतोडणीच्या कामात दिवस-रात्र राबणाऱ्या या महिलांचे जीवन कष्टांनी भरलेले आहे. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता त्या साखर उद्योगाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी या महिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्याबरोबर हळदी-कुंकवाचा सण प्रजासत्ताक दिनी रविवारी (ता. २६) साजरा करण्याचा निर्णय घेतला.
महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रांताधिकारी पाटील यांनी स्वतः महिलांना हळद-कुंकू लावून, त्यांच्या हातावर वाण ठेवले. वाणात साडी देऊन त्या महिलांचा सन्मान केला. साडी हातात घेताना काही महिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हा क्षण त्यांच्या जीवनातील एखाद्या अद्भुत अनुभवासारखा होता. मायेच्या शब्दांनी आणि सन्मानाने कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटल्याचे दिसत होते. यावेळी मंडलाधिकारी शीतल कुयटे, नूतन जाधव आदी उपस्थित होत्या.