कोल्हापूर : गडहिंग्लज कारखान्याच्या गैरकारभाराची चौकशी करण्याचे साखर सहसंचालकांचे आदेश

कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन कारभाराची चौकशी करावी, असे निर्देश प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी दिले आहेत. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, सभासद संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत, चंद्रकांत सावंत यांच्या तक्रारीनुसार चौकशी करून हे आदेश दिले आहेत. माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या कारकिर्दीतील मनमानी व नियमबाह्य कामकाजाची सखोल चौकशी करावी, त्यास जबाबदार अधिकारी, पदाधिकारी व संचालक यांच्यावर कारखान्याच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी आणि रक्कम व्याजासह वसूल करावी, असा आदेश देण्यात आला आहे.

सहकार कायद्यातील तरतुदीनुसार चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी विशेष लेखापरीक्षक डी. बी. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. शासकीय व कारखाना लेखापरीक्षकांच्या चौकशी अहवालावरूनच संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. दीड महिन्यांपूर्वी लेखापरीक्षकांच्या फिर्यादीवरून डॉ. शहापूरकर, ३ माजी कार्यकारी संचालक, ४ अधिकाऱ्यांसह २१ जणांविरुद्ध कारखान्यातील सुमारे ३० कोटींच्या घोटाळा प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. लेखा परीक्षणानुसार २९ कोटी ७१ लाख ८२ हजारांचे नुकसान झाल्याचा लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांच्याकडून सादर ६ मुद्दयाचा विनिर्दिष्ट अहवाल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here