कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे (गोडसाखर) संचालक सदानंद हत्तरकी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालकपदी त्यांचे बंधू शिवशंकर राजकुमार हत्तरकी (हलकर्णी, ता. गडहिंग्लज) यांची एकमताने निवड झाली. प्रादेशिक सहसंचालक (साखर) जी. जी. मावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया झाली. कारखाना कार्यस्थळावर ही सभा झाली.
रिक्त पदासाठी शिवशंकर हत्तरकी यांचा एकमेव अर्ज होता. संचालक रवींद्र पाटील सूचक राहिले, तर संचालक सतीश पाटील यांनी अनुमोदन दिले. मुदतीत एकच अर्ज प्राप्त झाल्याने मावळे यांनी हत्तरकी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. त्यानंतर मावळे यांच्या हस्ते हत्तरकी यांचा सत्कार झाला. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक सतीश पाटील यांची भाषणे झाली. कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, प्रभारी सचिव एस. व्ही. हरळीकर आदी उपस्थित होते.