नवी दिल्ली : यंदाचा ऊस गळीत हंगाम दुहेरी संकटातून जात आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये लाल सड रोगाचा फैलाव आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादनात मोठी घट होत आहे. त्याचा वाईट परिमाम उसाच्या उत्पादकतेवरही होत असून नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत चालणारा गाळप हंगाम मार्चच्या मध्यात संपू शकतो. याबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (एनएफसीएसएफ) दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात फक्त ५०७ साखर कारखाने कार्यरत आहेत. तामिळनाडू आणि महाराष्ट्रात काही साखर कारखाने बंद आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील साखर कारखान्यांची स्थितीही चांगली नाही. गाळपासाठी आधीच उसाचा तुटवडा आहे. मार्चमध्येच अनेक चालू कारखाने बंद करावे लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
‘जागरण’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यंदा देशाच्या चालू हंगामात साखर उत्पादनात ४९ लाख टन घट होण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी ३१९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यावेळी फक्त २७० लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. देशात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही सर्वात जास्त साखर उत्पादक राज्ये आहेत, तिथे शूट बोअरर आणि लाल सड रोगामुळे उत्पादन कमी झाले आहे. गेल्यावर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांपर्यंत सुमारे दहा लाख टन ऊस पोहोचलेला नाही. उत्तर प्रदेशात आतापर्यंत ८ लाख टनांहून अधिक ऊस गाळप झाला असला तरी, लवकरच उसाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. इतर राज्यांमध्येही परिस्थिती फारशी चांगली नाही. एनएफसीएसएफच्या मते, तामिळनाडूमध्ये चालू हंगामात फक्त ८.५० लाख टनांपर्यंत उत्पादन होण्याची अपेक्षा आहे, जी मागील हंगामाच्या १०.७५ लाख टनांपेक्षा कमी आहे.