बिजनौर : ऊस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी रायपूर बेरीसाल गावातील शेतकऱ्यांनी बिजनोर- हरिद्वार रास्ता रोको केला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी बरकतपूर साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवली. इतर सर्वसामान्य वाहनांची वाहतूक मात्र सुरूच ठेवली. उसाने भरलेले ट्रक, ट्रॅक्टर ट्रेलर रस्त्याच्या एका बाजूला रांगेत थांबविण्यात आले. मोहम्मदपूर देवमल विभागातील रायपूर बेरिसाल गावातील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून कागदपत्रांची पूर्तता करून गावात बरकतपूरच्या उत्तम साखर कारखान्याने खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत आहेत.
ऊस विभागाच्या जवळजवळ सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, बरकतपूर कारखाना शेतकऱ्यांना खरेदी केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. लांब अंतरावरील ऊस वाहतुकीत अनेक अपघात होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. १५ दिवसांपूर्वी, कारखाना प्रशासनाने नजीबाबाद तहसीलच्या सक्षम अधिकाऱ्यांशी चर्चेवेळी दहा दिवसांत गावात पर्यायी ऊस खरेदी केंद्र सुरू केले जाईल असे आश्वासन दिले. मात्र, ते पाळलेले नाही असा आरोप करत शेतकऱ्यांनी कारखान्याचा निषेध केला. भारतीय किसान युनियन टिकैत गटाचे मोहम्मदपूर विभाग अध्यक्ष डॉ. विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली, चौधरी सत्पाल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. पंकज शहरावत, जितेंद्र पहेलवान, कोमन सिंह, मंदावर विकार अहमद, ब्रजेश कुमार, देवेंद्र सिंह चिकारा आदी उपस्थित होते. जिल्हा ऊस अधिकारी आणि कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत शेतकऱ्यांना पाच दिवसांत रायपूर बेरिसाल गावात ऊस खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.