बीड : माजलगाव परिसरातील ऊस पट्ट्यात असलेले तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके, सावरगाव येथील छत्रपती तर, पवारवाडी येथील जय महेश हे तीन साखर कारखाने यावर्षी पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. दि. २९ जानेवारीपर्यंत या तिन्ही कारखान्यांनी एकूण १० लाख ९८ हजार १४३ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून सहा लाख ९५ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तिन्ही कारखान्यांचा साखर उतारा साडेनऊ ते दहाच्या दरम्यान आहे.
माजलगाव, पैठणच्या जायकवाडी धरणाचे कालवे, बॅक वॉटर, या भागातील उच्चपातळी बंधाऱ्यात पाणी असल्याने उसक्षेत्र वाढले आहे. शेतकरी यंदा पुन्हा एकदा उस लागवडीकडे वळला आहे. गेल्यावर्षी उसाची लागवड कमी प्रमाणात झाली होती. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना शेतातील उस काढून टाकला होता. त्यामुळे ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध आहे. यंदा गाळपासाठी उस आणण्याची तिन्ही कारखान्याची स्पर्धा लागली आहे. सद्यस्थितीत जय महेश कारखान्याने सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे. सुंदरराव सोळंके कारखान्याने ७५ लाख ४२ हजार ६९९ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.