मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांसाठी इथेनॉल खरेदी किमतीत सुधारणा करण्यास मंजुरी दिली. मात्र, केंद्राने सी हेवी मोलॅसिसपासून (मळी) तयार होणाऱ्या इथेनॉलचे खरेदी दर प्रति लिटर ५६.५८ रुपयांवरून ५७.९७ रुपये केला आहे. उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून उत्पादीत होणाऱ्या इथेनॉलचे दर जेसे-थे ठेवले आहेत. सी हेवी मोलॅसिसपासून फार इथेनॉल तयार होत नसल्यामुळे आणि फक्त १.३९ रुपये इतकी किरकोळ दरवाढ झाल्यामुळे साखर उद्योगात नाराजीचे चित्र आहे. यातून साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. इथेनॉलचे दर आणि साखरेच्या किमान विक्री मूल्याची उसाच्या एफआरपीशी सांगड घालावी. एफआरपी वाढविताना इथेनॉल आणि साखरेचे दरही वाढवावेत, अशी मागणी होती.
केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसेसपासून उत्पादीत इथेनॉलचा खरेदी दर ५६.५८ रुपये प्रति लिटरवरून ५७.९७ रुपये लिटर केला. मात्र, दरवाढीचे केवळ गाजर दाखवले अशा साखर उद्योगातून संतप्त प्रतिक्रिया आहेत. याबाबत वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले की, साखर कारखान्यांतून यंदा ६५० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन होईल. त्यात सी हेवी मोलॅसिसपासून होणारी इथेनॉल निर्मिती जेमतेम ५ ते ७ टक्केच आहे. ६५० कोटी लिटरपैकी सी हेवी मोलॅसिसपासून जेमतेम ५० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचा अंदाज आहे. त्यामुळे याचा खरेदी दर १.३९ रुपयांनी वाढवून साखर कारखाने, शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही.