छत्रपती संभाजीनगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भविष्यातील विचार करून गंगापूर सहकारी साखर कारखान्याला आपला ऊस द्यावा, असे आवाहन एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केले. गंगापूर- खुलताबाद तालुक्यांतील सर्व ऊस उत्पादक शेतकरी मागील वीस वर्षांपासून ऊस तोडणीसाठी संघर्ष करत आहात. चालू हंगामापासून गंगापूर सहकारी साखर कारखाना मोठ्या कालावधीनंतर चालू झालेला आहे.
यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस लागवड झालेली आहे. अशा वेळेस पुढील हंगामामध्ये ऊस जास्त झाल्यास बाहेरचे कारखानदार आपल्याकडे येणार नाहीत, अशा परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्यातील कारखानेच आपल्याला मदत करू शकतात. योग्य भाव व अचूक वजन देऊन कारखाने सदैव शेतकऱ्यांसोबत राहतील. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गंगापूर कारखान्यालाच आपला ऊस द्यावा, कार्यक्षेत्राबाहेरील कारखान्यांना ऊस देऊ नये, असे आवाहन डोणगावकर यांनी केले.