पुणे:दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना गळीत हंगाम २०२४- २५ मध्ये विनापरवाना ऊस गाळप केल्याप्रकरणी सुमारे २० कोटी ३२ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.या कारखान्यांनी सात दिवसांच्या आत ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्याचे आदेशसाखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. २० जानेवारी रोजी हा आदेश देण्यात आला आहे. यामध्ये दोन सहकारी आणि दोन खासगी कारखान्यांचा समावेश आहे.विनापरवाना ऊसगाळपावर प्रतिटनास ५०० रुपये इतकी दंडाची रक्कम आकारण्यात येते. महाराष्ट्र साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण व गाळप आणि ऊस वितरण नियमन) आदेश १९८४ आणि शासनाच्या १४ ऑक्टोंबर २०१५ च्या आदेशातील तरतुदी अन्वये या कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या कारखान्यांमध्ये मंगळवेढ्याच्या श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखान्यास सर्वाधिक १० कोटी २२ लाख ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर भीमा सहकारी साखर कारखान्यास (टाकळी सिकंदर, ता. मोहोळ) ३ कोटी १३ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा दंड झाला आहे. खासगी क्षेत्रातील गोकुळ शुगर इंडस्ट्रिज लिमिटेड (धोत्री, ता. दक्षिण सोलापूर)ला ५ कोटी ७० लाख ९७ हजार ५०० रुपये आणि मातोश्री लक्ष्मी को जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड (रुद्देवाडी, ता.अक्कलकोट) या कारखान्यास १ कोटी २४ लाख ८० हजार रुपयांचा समावेश आहे. कारखान्यांनी गाळप परवाना घेण्यापूर्वी आवश्यक ते पैसे शासन निर्णयाप्रमाणे जमा करणे आवश्यक आहे. मात्र या कारखान्यांनी हे पैसे भरलेले नाहीत.