कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात दिवसेंदिवस ऊस तोडणीची समस्या गंभीर होत आहे. ऊस उत्पादकांना तोडणी यंत्रणांकडून वेठीस धरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे कारखानेही हतबल झाल्याचे चित्र पश्चिम महाराष्ट्रात आहे. उसाला वाडे नाही, पडला आहे, तणकट आहे अशी विविध कारणे सांगत उसाची तोड करणे टाळले जात आहे. मुदत संपून गेलेल्या उसाबाबत शेतकरी चिंतेत असताना त्यांना तोडणी यंत्रणेकडून वेठीस धरले जात आहे. अनेक ठिकाणी ऊस तोडणीवरून वादाची ठिणगी पडत असल्याचे चित्र आहे. एकीकडे वेळेत ऊस तोडणीचा दबाव, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तिखट शब्दांमुळे अनेक नामवंत कारखान्यांचे शेती अधिकारीही हतबल झाल्याचे चित्र आहे.
‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तोडणी क्रम बिघडल्याने पंधरा महिने किंवा त्याहून अधिक काळ शेतात असणाऱ्या उसाची तोड करणे दिव्य ठरत आहे. छोट्या शेतकऱ्यांना मजुरांनी तोडणी केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. प्रादेशिक साखर सहसंचालकांनी यापूर्वी तोडणी यंत्रणांकडून पैसे मागितले असतील तर प्रशासनाकडे तक्रार करा, कारवाई करू, असा आदेश काढला होता. पण त्यालाही अपवाद वगळता प्रतिसाद मिळालेला नाही. कारखान्यांच्या ऊस विकास विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या हाताबाहेर परिस्थिती गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी जे कारखाने नेतील त्या कारखान्याला ऊस पाठविण्याचा प्रयत्न करीत आहेत.