सातारा: जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आदेश काढले आहेत. त्यानसार, येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाट्याची तपासणी शासकीय भरारी पथकाने अचानक भेट देऊन केली. पथकातील सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे केलेल्या तपासणीत हा काटा अचूक असल्याचे दिसले. यापूर्वीही अनेक वेळा कृष्णा कारखान्याचा वजन काटा अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे.
पथकाने उसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवल्या. चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे दिसले. वजन काट्याबाहेर लावलेल्या डिस्प्लेवर भरलेल्या वाहनांचे व रिकाम्या वाहनांचे वजन अचूकपणे होत असल्याचे दिसले. तहसीलदार कार्यालयाचे निरीक्षण अधिकारी महादेव आष्टेकर, वजनमापे निरीक्षक योगेश अग्रवाल, विशेष लेखा परीक्षक डी. एस. खाडे, एस. आर. सानप, हवालदार एस. ए. गुरव, शेतकरी संघटनांचे देवानंद पाटील, उत्तम साळुंखे, तात्यासाहेब पाटील, सुनील कोळी, दीपक पाटील, अशोक लोहार, विशाल पुस्तके आदींनी ऊस वजन काट्याची तपासणी केली. यावेळी दादासाहेब शेळके, सत्यजित घाडगे, विजय मोहिते, गोविंद मोहिते संरक्षण अधिकारी संजय नलवडे, विक्रम थोरात आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.