सांगली : सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये महसूल विभाग, वैधमापन विभाग, पोलिस व शेतकरी प्रतिनिधी असलेल्या भरारी पथकाने चिखली (ता.शिराळा)येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी केली. येथील वजनकाटा बिनचूक असल्याचे प्रमाणपत्र भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी दिले. पथकाने कारखान्यास अचानक भेट देऊन वजन- काट्यांची तपासणी केली होती.
नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, वैधमापन निरीक्षक योगेश आगरवाल, पीएसआय उदय पाटील, लेखापरीक्षक रमेश व्हनखंडे, बळीराजा संघटनेचे बी.जी.पाटील व गणेश शेवाळे या पथकाने ही तपासणी केली.पथकाने यावेळी वजन होऊन गव्हाणीकडे गेलेल्या वाहनांचीही फेरतपासणी केली.रिकाम्या वाहनांची वजने तपासली.तपासणी झालेल्या वाहनांची नोंदणी असलेल्या पुस्तकांची व नोंदीची तपासणी केली.भरारी पथकाने वजनकाटा अचूक असल्याचे प्रमाणपत्र कारखाना प्रशासनास दिले आहे.केनयार्ड निरीक्षक शंकर येवले उपस्थित होते.